Friday, March 17, 2006

सुकलेली फुले...

-
सुकलेली फुले वहीच्या पानामध्ये
आठवणी मात्र ताज्या,मनामध्ये ।

जपून ठेव वही सुकलेल्या फुलांची
पण झटक धूळ जुन्या आठवणींची ।

नव्या ऋतूत नवी फुले उमलतात
सुकलेल्या फुलात मने अडकतात ।

वहीतल्या फुलांना विसरू नको
पण बहरल्या फुलांना मुकू नको ।

नव्या फुलांचा सुगंध घेत जा
वहीत ठेवणे मात्र टाळत जा ।

कारण वहीत उरतात सुकलेली फुले
आणि झाडांवर बहरतात नव्याने फुले ।

-प्रणव

Tuesday, March 07, 2006

निरोप...

-
तुला निरोप देणे, मला आज जमणार नाही
मनातील वेदनेला, मेंदूकडे काहीच इलाज नाही
अश्रू आपोआप गालांवरून ओघळू लागतात
पापण्यांचा अडसर, थांबवाया त्यांना समर्थच नाही ।

मी येतो तुझ्यासमोर, पण तुला मी जाणवतच नाही
भरलेल्या डोळ्यांनी मी, डोळे भरून पाहू शकत नाही
जोरात ओरडायचे असते, तू काहीच करू देत नाहीस
तुझा तो अथांग शांतपणा, मला व्यक्तच होऊ देत नाही ।

त्या पांढऱ्या शुभ्र कापडाखाली, तू शांत नेटकी
गबाळा अस्ताव्यस्त असा मी अंतर्बाह्य एकाकी
तू कधीच असणार नाहीस माझ्यासोबत ही वस्तुस्थिती
आणि जाताना तुझे सांगणे "मी तुझ्यातच असेन की"

सगळीकडे एकच गोंधळ तरी मी सावरतो
माझ्यातल्या तुझ्याशीच मी बोलू पाहतो
लोक मला ठार वेडा म्हणत राहतात
पण माझ्यातल्या तुझा त्यांना पत्ताच नसतो ।
माझ्यातल्या तुझा त्यांना पत्ताच नसतो !

-प्रणव