Monday, February 05, 2007

वेड लागलंय...

-थोडंसं सांगण्यासारखं...

आधीच सांगतो..."कसा निघेल इथुन पाय, वेड लागलंय नाहीतर काय !" ही ओळ संदीप खरेची आहे. भन्नाट आहे!
आता ही कविता कशी झाली त्याबद्दल... एकदा सुजितने मला चार ओळी SMS केल्या. तो कविता करायला लागला माहीत होतं...त्या ओळी इतक्या जबरदस्त होत्या की मला रिप्लाय केल्याशिवाय रहावलं नाही...खरंतर मी बरेच दिवस काही लिहीलं नव्हतं, काही खास सुचलंच नव्हतं...बॅडपॅच फ़क्त क्रिकेटर्सनाच नसतो, तो ब्लॉगर्सना पण येतो आणि त्यातल्या त्यात कवितेसारखे काहीतरी लिहीणार्यांना जास्तंच येतो ! पण मग विचार चालू झाला आणि त्या ओळींचा संदर्भ घेऊन मी पण काहीतरी पाठवलं...पुन्हा त्याचं उत्तर आलं...मी पुन्हा चार ओळी पाठवल्या...कविता बनत गेली.
मग एक-दोन दिवसांनी फोन झाला आणि समजलं की सुजित मला संदीपच्या ओळी पाठवत होता. मग मी लिहीलेली कडवी एकत्र केली आणि थोडे-फ़ार बदल,भर असे करून ही कविता बनली. कदाचित अजून बदल होत राहतील...बघूया. पण नक्की सांगा कशी वाटते ते...


- कविता

ऋतू आलाय बहरावर,
कोकीळ गातोय आंब्यावर,
मलाही आता राहवत नाय,
सूरात सूर मिसळत जाय,
कसा निघेल इथुन पाय, वेड लागलंय नाहीतर काय !

अशी वेळ एकांताची,
अशी रात्र विरहाची,
आता चंद्र उगवलाय,
तुही बेचैन सांगू लागलाय,
कसा निघेल इथुन पाय,वेड लागलंय नाहीतर काय !

इष्काच्या दुनियेत शिरलो काय,
कवितेवर कविता सुचत जाय,
काही नाही त्यात तुझ्याशिवाय,
आहे का याला काही उपाय,
कसा निघेल इथुन पाय, वेड लागलंय नाहीतर काय !

अचानक तू येतेस काय,
मला मिठीत घेतेस काय,
घुसळून निघतात भावना सार्या,
मन आकाशापल्याड जाय,
कसा निघेल इथुन पाय, वेड लागलंय नाहीतर काय !

- प्रणव-सुजीत