Tuesday, November 28, 2006

चारोळ्या

-
एकच हास्य आणि बोलके डोळे
मुक्यानेच पोचवतात भावना,
हे जर उमजले,मनास समजले
तर नाही ऐकावे लागत शब्दांना

-
आपली ताटातूट काही दिसांची
तुला नि मला दोघांना नकोशी,
दाटलेल्या भावनांची डोळ्यात गर्दी
रडायचे नाही ठरलंय मगाशी ।

-
जुन्या चिट्ठ्यांच्या आठवणीत अजून हरवतो
'त्या निरोप्याची' वाट आतुरतेने पाहतो
कधी एकदा 'शेवटचे बोलावणे' येईल
आणि पुन्हा आपली भेट होईल ।

-
आयुष्याच्या एका वळणावर
तू अचानक भेटलीस
पुढच्या प्रत्येक पावलासोबत
तू असाविशी वाटलीस ।
-
हल्ली तुझी आठवण येते
पण तू मुळीच येत नाहीस
पूर्वी स्वप्नात तरी भेट व्हायची
हल्ली तू झोपूच देत नाहीस

एक हिन्दी पण-
-
सिर्फ़ प्यार होना काफ़ी नहीं
प्यारसे इझहार होना ज़रूरी है ।
सिर्फ़ दो-चार बातें काफ़ी नहीं
आंखोंसे इशारे भी होना ज़रूरी है ।

Tuesday, November 07, 2006

अश्रू...

-
दु:ख बिचारे आतल्या आत
कुढत असते आपल्या जगात,
मुक्त व्हावे, कधी वाटते त्याला
येते पाणी दोन्ही डोळ्यात ।

शब्दही जेव्हा संपतात
डोळ्यातून अश्रू बाहेर येतात,
शब्दापलीकडले सारे काही
चार थेंब बोलून जातात ।

आपणच दु:ख मनात ठेवतो
अश्रुंना कठोर धरण बांधतो,
रडण्यात काही गैर नाही
देवही नेमाने पाउस पाडतो !

नव्हेत थेंब खाऱ्या पाण्याचे
अश्रू बनले आहेत रक्ताचे,
मनाला हलके करणारे
आहे वरदान हे देवाचे ।

एक क्षण असतो रडण्याचा
मनाला स्वच्छ करण्याचा ,
रडताना बाहेर, आतमध्ये
काही निश्चय करण्याचा ।

दुसरा क्षण असतो मोलाचा
डोळे पुसून उभे राहण्याचा,
मनीचे संकल्प साकार करून
पुन्हा दिलखुलास हसण्याचा ।

- प्रणव