Monday, December 26, 2005

कविता

एकदा ती माझ्याकडे आली
माझ्याबरोबर 'चल' म्हणाली,
'हो' म्हणायच्या आतंच ती
देऊन हात, घेऊन गेली

होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत,
पायवाट निळसर नव्हती संपत
नभी चांदणे, चंद्रासंगत

गोड गप्पा नव्हत्या थांबत
सुरेल आवाज जणू कोकिळेगत
मौनामधे भासे दिव्य एक रंगत
अनवट सूर, बासरीचे उमलत

हसताना ती बाहुली दिसायची
बारीक डोळे अलगद लाजायची,
गालांवर खळी नाजुक पडायची
नयन शिंपल्यात, जपावी वाटायची

तरूतळी एका आम्ही बसलो
मनीचे सारे तिला मी वदलो,
हात थरथरता तिच्या हातात
परि नजर थेट डोळ्यात

काय झालं पूढे सांगत नाही
स्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,
झालो जागा तरी उठलो नाही
करत विचार पडलो मी,
प्रेमामधे तर पडलो नाही !

-प्रणव

Tuesday, December 20, 2005

तो पिंपळ


आठवतो का तुला तो पिंपळ
वळणावरील आडोशावरचा,
त्या अविस्मरणीय दिवसातील
आपला साथीदार नेहमीचा

आठवतात त्याला ते दिवस
हसण्याचे, रुसण्याचे
डोळ्यातील दुसर्याच्या
मुग्ध भाव ओळखण्याचे

ऐकाव्याशा वाटतात गप्पा
हिवाळ्यातील उबदार,
रिमझिम पावसातील निःशब्द
नि उन्हाळ्यातील थंडगार

कधी वाटले फ़ारंच तुला
तू न लाजता त्याच्याकडे जा,
सांगेल तो तुला माझे झुरणे
तू दिलेली जन्मभराची सजा

त्या दिवशी तो ही खूप रडला
पण मला 'जा' म्हणाला,
का तर म्हणे कुणी दोघांनी
कालच तिथे आणाभाका घेतल्या

मात्र तो त्यांची बोलणी
पूर्वीसारखी ऐकत नाही,
मला म्हणतो कसा
दुसरा धक्का आता सोसणार नाही

किती येतील किती जातील
तो पिंपळ त्यांना कवेआड घेइल,
पण पहिला धक्का मात्र त्याला
कायमचा सलत राहील...

अगदी मला सलतोय ना
तसाच....
-प्रणव