Friday, September 01, 2006

तुझ्यावीण वाटे... (मनातलीचे श्लोक)

-
फ़ुलाने फ़ुलावे तुला पाहताना
त्वरे भास्कराने ढगाआड जावे
झुळूकीस वाटे तुझा गंध घ्यावा
तुझा सूर भासे ग मंजूळ पावा |

तुझा स्पर्श होता लतांनी झुकावे
फ़ुलांनी भरावे तुझ्या ओंजळींना
तुझा स्पर्श होता तरूही शहारे
नि प्राजक्त मोती तुला भेट द्यावे |

जणू चालती बोलती बाहुली तू
मनी माझिया बैसलेली परी तू
तुला हासता पाहतानाच झालो
दिवाणापिसा मी, अता सावरी तू |

असे मी एकाकी तरी तू सुचावे
नसे तू तरीही मला का दिसावे
कसे भास आभास होती मनाला
कुणी आवडे का इतूके कुणाला |

तुझ्यावीण वाटे जगावे कशाला
तुझ्यावीण आयुष्य पूढे सरेना
तुझ्या कारणे मीच जन्मास आलो
तुला काय सांगू मलाही कळेना |

-प्रणव
( चाल: मनाचे श्लोक )