Friday, June 23, 2006

पाऊस असतोच असा....

जेव्हा तीन मित्र एकत्र येतात...निनाद, सौरभ आणि प्रणव....जेव्हा तिघांनाही कविता आवडत असतात...
बर्याच वर्षांनी हा समान धागा लक्षात आला असतो...

आणि जेव्हा बाहेर चौथा मित्रसुद्धा असतो...त्यानेच सगळा माहौल जमवलेला असतो...
होय...बाहेर पाऊस पडत असतो...!

तेव्हा यापेक्षा वेगळे काय होणार...
एकानंतर एक कडवी सूचत गेली...ती संध्याकाळ यादगार बनत गेली...
याहू संभाषकाचा असा उपयोग क्वचितच झाला असेल...

आमच्या तिघांची एक कलाकृती...!!!

---------------------------

पाऊस - तिच्या माझ्यातला

पाऊस असतोच असा, दोघांना एकत्र आणणारा
हलकेच विजेस सांगून, सर्व अंतरे तोडणारा

        पाऊस असतोच असा, मनात खोल बसणारा
        त्या गाफील क्षणांची, आठवण करून देणारा

पाऊस असतोच असा, माझ्या परसात कोसळणारा
आम्ही लावलेले रोप, आपल्या हाताने फुलवणारा

        पाऊस असतोच असा, तिच्यासारखा वागणारा
        कधी तरी मुसळधार, कधी रिमझिम बरसणारा

पाऊस असतोच असा, तिच्यासारखा येणारा
दबक्या पावलांनी येऊन,वादळापरी बरसणारा

        पाऊस असतोच असा, क्षणात वेडा करणारा
        आठवणींनी नुसत्या, रोमांच उभे करणारा

पाऊस असतोच असा, तिने माळलेला मोगरा
निघून गेल्यावर ही , मृदगंध मागे ठेवणारा

पाऊस - जीवन गाणे गाणारा

पाऊस असतोच असा, मुक्त्त खाली पडणारा
आभाळातले जीवन, धरतीवर आणणारा

        पाऊस असतोच असा, बेभान कोसळणारा
        तापल्या धरतीला, शांत हिरवे करणारा

पाऊस असतोच असा, मृदगंध फुलवणारा
केवळ एका क्षणात, गात्रे त्तृप्त करणारा

पाऊस- थोडा हवासा, थोडा नकोसा

पाऊस असतोच असा, लहरीपणे वागणारा
सरळ सरळ पडतापडता, वाकडा-तिरपा होणारा

        पाऊस असतोच असा, चोरासारखा वागणारा
        हळूच नजर चूकवून, खिडकीतून आत येणारा

पाऊस असतोच असा, हाहाःकार माजवणारा
घरात पाणी पण, टाकी मोकळी ठेवणारा

        पाऊस असतोच असा, खूप काही देणारा
        देता देता मात्र कधी, सारे काही नेणारा

पाऊस असतोच असा, थोडा मनाविरुद्ध वागणारा
मागता न पडणारा, पडता न थांबणारा

        पाऊस असतोच असा, वाऱ्याशी खेळ खेळणारा
        गाडीवर टोपी अन, हातातली छत्री उडवणारा

पाऊस - आठवणींचा...

पाऊस असतोच असा, हवा तेंव्हा येणारा
डोळ्यातले खारे पाणी, जगापासून लपवणारा

        पाऊस असतोच असा, कागदी होड्यांत रमणारा
        बालपणीचे ओले क्षण, हाती ठेवून जाणारा

पाऊस असतोच असा, हृदयाला भिडणारा
उरी जपलेले नाजूक क्षण, अलगद जागे करणारा

        पाऊस असतोच असा, माझ्या दारी पडणारा
        डोक्यावरच्या छताची, जाणीव करून देणारा

पाऊस असतोच असा, स्मृती जाग्या करणारा
पाठच्या आठवणींमध्ये, चिंब चिंब भिजवणारा
-

Wednesday, June 21, 2006

त्रिवेणी

-
दिवस-रात्र तेच चाक फिरवत पळायचं,
त्याच बाहुल्यांचं लग्न पुन्हा-पुन्हा लावायचं,
पण, लहानपणी हे सगळं मनापासून व्हायचं!

-
वाऱ्याचे गरम झोत नि उन्हाचा जाळ,
पावसानंतर चिखल नि पाण्यातला गाळ,
मनंच असं की, आहे त्यात रमत नाही...!

-

आजची मैफ़ील छान झाली

म्हणाले सगळे सह्या घेता

तो 'सा' अजून शोधतोय मी...

:: (१४ जून '०८)

Tuesday, June 20, 2006

आठवणी तुझ्या...

-
फुले गंधाने वेडा करतात
आणि नंतर सुकून जातात,
कधीतरी तो गंध आठवतो
पुन्हा बेभान करून जातो
आठवणी तुझ्या फुलांसारख्या...|

मुसळधारांचा वर्षाव करतो
आणि कधी रिमझिमत येतो,
कधी इंद्रधनुष्य फुलवतो
कधी वाट पहाया लावतो
आठवणी त्या पावसासारख्या...|

सतत जाणीव करून देतो
पायी बोचून राहिलेला काटा,
नाजूकपणे गुलाबफुलास
हाताळायला लावतो काटा
आठवणी तुझ्या काट्यासारख्या...|

-प्रणव