Sunday, February 26, 2006

...चालले

-
दगडाच्या मूर्तीला ते, दान मागूनी चालले
दारावरच्या याचकाला, बघता न बघूनी चालले ।

करण्या रिता घडा पापांचा, लोक तिर्थक्षेत्री चालले
माळ हाती प्रभूनाम मुखी, विचार अजूनी चालले ।

का मी पिंजऱ्यात सोन्याच्या, एकटाच अडकलो
मुक्त गगनी सर्व मित्रपक्षी, माझे उडूनी चालले ।

एकाला झाका दुसऱ्या उघडा, दिवस एकसूरी झाले
जणू काही सारे बगळे, एकामागूनी चालले ।

नाही एकटे प्रवासी आपण, समुद्रावर रेतीच्या
अनेक काफिले प्रतिदिनी, वाळवंटातूनी चालले ।

लढू तरी कोणाशी आता, कोर्टात आयुष्याच्या
माझे सारेच दावे ते, फ़ेटाळूनी चालले ।

जगण्यासाठी दमडी कमावता, खूप काही गमावले
पोटासाठी काम माझे, मन मारूनी चालले ।
-प्रणव

Tuesday, February 21, 2006

...संपले

-
क्षणी ज्या भक्तातील या, माणूसपण संपले
गाभाऱ्यातल्या मूर्तीमधले, देवपण संपले |

चालीरीती धर्म जाती, थोतांड सारे माजले
दिले झुगारून जोखडांना, दडपण संपले |

असहाय्य गोरे बनले, अन्यायी काळे माजले
पेटून तरी कसे उठावे, सरपण संपले |

वास्तवाची धग अन खोटे जग, मन करपले
काय करावे कसे सांगावे, शब्द पण संपले |

प्रेमळ नजर नेहमीची, आज अनोळखी भासली
वाटले जणू घराचे माझ्या, घरपण संपले |
-प्रणव

Tuesday, February 14, 2006

असे घडले कधीच नव्हते...

-
तो आणि ती :
आम्ही सांगतोय, यापूर्वी घडले, कधीच नव्हते
सत्यात सोडा, स्वप्नातही कल्पले, कधीच नव्हते ।

ती :
नजर माझी, सतत घ्यायची, ठाव तुझा
तू न सुचता, डोळे मिटले, कधीच नव्हते ।

तो :
शोध घ्यायची, तुझी नजर, माझा व्याकूळ
तुला का वाटले, मज कळले, कधीच नव्हते ।

ती :
कसे बोलावे, की न सांगावे, गूज मनीचे
मनास माझ्या, उत्तर सापडले, कधीच नव्हते ।

तो :
कळूनही मजला, काही नव्हता, उपाय याचा
कसे सांगू माझे, मन जडले, कधीच नव्हते ।

ती :
काय वाटेल, तुझ्या मनाला, कसे वाटेल
प्रश्न असले, मजला पडले, कधीच नव्हते ।

तो :
मोडावे तुझे, की मारावे माझे, दोन्ही मनेच
कोडे असले, मजला सुटले, कधीच नव्हते ।

ती :
त्याला सांगितले, तुझ्याबद्दल काय, मला वाटते
समजणारे असे, कोणी भेटले, कधीच नव्हते ।

तो :
तिला विचारले, माझ्या जागी, काय असते केले
सबुरीचे धोरण, मला आठवले, कधीच नव्हते ।

ती :
त्याचे विचार, त्याचे दिसणे, त्याचे हसणे
तुझ्यासोबत मी, इतकी हसले, कधीच नव्हते ।

तो :
तिच्या आठवणी, तिचे लाजणे, तिचे सजणे
असले विश्व मी, पूर्वी अनुभवले, कधीच नव्हते ।

तो आणि ती :
सरतेशेवटी, आम्हीच कारण, दुसऱ्याच्या सुखाचे
यश चोप्रांच्या प्रेमपटातही,असे घडले, कधीच नव्हते ।

-प्रणव

Monday, February 13, 2006

पहिली गद्य नोंद...

-
खुलासा: या पोस्टमधे सांगितलेल्या सर्व व्यक्ती काल्पनिक आहेत.

खाली जी कविता आहे 'अजूनही ती तशीच आहे' या नावाची, ती मित्रांना दाखवली. अमेरिकेतल्या मित्राचा निरोप आला...त्याने विचारले,"इंग्रजी भाषांतर आहे का?" आता हा मराठी मित्र असे का विचारतो असा प्रश्न आपल्या मनात येईल. मनात काही उत्तरे पण येतील..चोराच्या मनात चांदणे ना! पण कृपया विचार करू नये हा या पोस्टचा उद्देश नाही. ( तसा या नोंदीला पहिली गद्य नोंद याखेरीज इतर फ़ाऱ मोठा उद्देशही नाही) आणि तुम्हाला कळले नसले तरी मला कळले आहे!

तर मग या कवितेचे इंग्रजी भाषांतर वगैरे चक्रे डोक्यात सुरू झाली. 'अजूनही ती तशीच आहे' हा जो रदीफ़ (की काफ़िया) की असलेच काहीतरी आहे, त्यासाठी 'She is still same' ठीक आहे... पण नाही भावना, प्रतिमा या मराठीत 'ती' आहेत पण इंग्रजीत she नाहीत. मुद्दाम नमूद करतो की ही विशेष नामे नाहीत. जाणकारांना ते समजले असेलच पण पुन्हा हे ही महत्त्वाचे की आपण कसले जाणकार आहात.

आणि 'ती' जरी एकच ठेवली आणि तिच्यावर गज़ल लिहिली आणि इंग्रजी भाषांतर करायचे म्हणले तरी 'केसात माळून मोगऱ्याची कळी' चे भाषांतर करायचे म्हणजे आमचे कसे होणार... एकवेळ हत्तीच्या पायाखाली द्या, पण असले काम नको. अमेरिकेतल्या मित्राचे काय हो तो GRE देऊन गेला आहे... असले इंग्रजी त्यांच्या हातचा मळ! या सर्व गोष्टीमुळे बेत बारगळला.

इतक्यात काय झाले तर अमेरिकेतल्या एका नेटमित्राचा निरोप आला. निरोप काय बॉम्ब आला... 'ही गज़ल नाही'. अरे देवा, एकातून बाहेर येत नाही तोपर्यंत हे दुसरे काय. पण मी सावरलो आणि गूगललो. समुद्रमंथनातून चौदाच रत्नं मिळाली... गूगलण्यातून १००००००० पाने सापडली. शून्ये मोजत बसू नका. महत्त्वाचे एक पान मिळाले ते पुढे देत आहे. जरूर वाचा आणि आपले ज्ञान वाढवा...गज़ल म्हणजे काय?

शेवटी तात्पर्य काय तर ती गझल नाही...आणि माझा पहिली गद्य नोंद लिहून झाली आहे.

अतिमहत्त्वाचा खुलासा:
वरचा खुलासा खोटा आहे. यात उल्लेखलेल्या सर्व व्यक्ती खऱ्या आहेत. अमेरिकेतला मित्र, अमेरिकेतील नेटमित्र यांना ही पहिली गद्य पोस्ट सादर अर्पण. बाकी भावना, प्रतिमा या व्यक्तिरेखा नाहीत, हे पुन्हा सांगावेसे वाटते.

धन्यवाद!

शब्दांच्या खेळानंतर...

-
दोस्ता असेल जर, थोडा वेळ तर, बोलू काही
शब्दांच्या या, खेळानंतर, बोलू काही |

उगी भांडणे, तप्त चांदणे, अबोल दुखणे
खुल्या दिलाने, मिटवून अंतर, बोलू काही |

तुझाच भास अन तुझाच ध्यास, अजाण त्रास
गुपीत याचे कळल्यानंतर, बोलू काही |

अनुभवांची, सुखदुःखांची, रंगपंचमी
रंगून होण्या, मस्त कलंदर, बोलू काही |

क्षणात सागर, क्षणात घागर, कधी हे निर्झर
अवखळ मनीचे, विचार सुंदर, बोलू काही |

दुजा सांगणे, स्वतः पहाणे, फ़ुका बहाणे
घेउनी क्रुत्यातून प्रत्यंतर, बोलू काही |

//रदीफ़ जमणे, मतला रचणे, अतीव सुखकर
//गझला करुनी, घ्या प्रत्यंतर, बोलू काही |

-प्रणव

हे कसे वाटते-

जीवन आहे अनुभवांची , रंगपंचमी
रंगून होण्या, मस्त कलंदर, बोलू काही |

Wednesday, February 08, 2006

अजूनही ती तशीच आहे...

पहिल्या प्रेमाची गोड आठवण, अजूनही ती तशीच आहे
माझिया मनातली हळवी जागा, अजूनही ती तशीच आहे |

अथांग सागर,अस्ताचा सूर्य साक्षी, अबोल तू-मी, दोन पक्षी
संध्याकाळ कोरलेली मनावर, अजूनही ती तशीच आहे |

ह्रुदयी ताल, श्वासास लय, अनवट सूर, गंध सर्वदूर
रात्री फुललेली धुंद रातराणी, अजूनही ती तशीच आहे |

असेल शुभ्र तुझ्यापरिस चांदणे, माहीत नसे त्यास गाणे
पौर्णिमेच्या रातीची तुझी मैफिल, अजूनही ती तशीच आहे |

कितीक रात्री सरून गेल्या, दिवसही आता तसे न उरले
मनातील तिची अनावर ओढ, अजूनही ती तशीच आहे |

किती आठवणी अपुऱ्या उपमा, एक अवर्णनीय प्रतिमा
केसात माळून मोगऱ्याची कळी, अजूनही ती तशीच आहे |

आठवणींची पुरचुंडी बांधता, एकही राहू नये बघता
अचानक ती ओझरती दिसली, अजूनही ती तशीच आहे |

-प्रणव